हरिश्चंद्र गड एक आव्हान आणि माझी फजिती

हि जी कथा आज तुम्हाला सांगणार आहे ती साधारण सन २००० च्या आसपास घडलेली आहे. म्हणजे आज पासून २४ एक वर्षांपूर्वी पण आज हि माझ्या मनात खोलवर दडून बसलीय. माहित नाही अनेकदा लिहून ठेवायचा प्रयत्न केला पण नाही जमू शकले. तशी एकदा एका वेबसाइट वर लिहून ठेवली आहे पण आता ती मिळत नाहीय. असो.

तर त्याकाळी मी ओमेगा इंटरॅक्टिव्ह टेकनॉलॉजिस नावाच्या कंपनीत कामाला होतो. छान ग्रुप जमला होता आमचा. एके दिवशी टिग्लि उर्फ शीतल आम्हाला म्हणाली चला आपण ट्रेक ला जाऊया. उत्साहाच्या भरात मी पण हा म्हटले. तेंव्हा जोश च वेगळा असायचा ना.

तारीख ठरली होळी ची. मी नाराज होतो पण मला हि ट्रेक ची संधी हुकवायची नव्हती. खरंतर रंगपंचमी हा माझा आवडता सण आणि मुंबई तर काय बहार असते नाही का?

कोण कोण येणार ह्याची यादी वगैरे तयार झाली. ऑफिस मधून मी श्रेयस मंजुषा आणि शीतल हे ट्रेक साठी आले आणि बाकी चे शीतल चे इतर मित्र होते. कसा जायचे कुठे भेटायचे सगळं ठरलं. माझा हा पहिलाच अनुभव होता. मला शीतल ने कल्पना दिली होती कि साधारण ४ ते ५ तास लागतील ट्रेक ला.

नेमका २ दिवस अगोदर मला ताप आला. मी नेहमी प्रेमाणे Dr. होडावडेकर म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर यांच्या कडून मेडिसिन घेऊन आलो. मला वाटले २-३ दिवसात ताप उतरेल मग काहीच प्रॉब्लेम नसेल ट्रेक ला जायला. सोबत औषध पण घेऊन ठेवले. आणि हाच अती शहाणपणा नडला.

होळी च्या दिवशी मी कामावर गेलो कारण ताप नव्हता आता आणि मला बर वाटत होत. ऑफिस मधून निघे निघे पर्यंत वेळ झाली आणी मी ठरवल्या प्रमाणे खांद्याला लावायची बॅग घेतली नाही. आणि मग जिम च्या बॅग प्रमाणे असलेली दोन हॅन्डल वाली बॅग न्यायचे ठरवले. (शहाणपणा नंबर २)

बॅग

आता पहिल्यांदाच ट्रेक जायचे म्हटल्यानंतर छान छान कपडे तर हवेच 🙂 लगेच मस्त पैकी २-३ Tshirts, एक्सट्रा जीन्स वगैरे कोंबली बॅगेत. कुणीतरी म्हटले कि तिथे जंगले आहे म्हणजे जनावरांची वर्दळ असते. झाले माझ्या कडे असलेली नेपाळ वरून खास आणलेली कुकरी पण सोबत घेतली. देव ना जाणो कुणी रानटी जनावर समोर आले तर. त्यावेळच्या सुपीक डोक्यातील कल्पना. आज हसु येतंय हे लिहिताना पण खरंच वयोपरत्वे अनुभवानेच शहाणपण येत. हे कळलंय आता.

कुकरी

रात्री एस टी ने प्रवास करायचा ठरले. खूप उशिरा आम्हाला बस मिळाली. आळेफाटा कि कुठेशी आम्हाला उतरायचे होते. पहाटे आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी उतरलो. पुरेशी झोप न झाल्याने मला थकवा जाणवत होता. आधीच ताप येऊन गेल्याने मी तसा पण अशक्त होतो. आता सकाळची उजाडायची वाट पाहण्या शिवाय गत्यंतर नव्हते.

सकाळी थोडी फार न्याहारी झाली आणि आम्ही ट्रेक सुरु केला. सुरुवात तर छान झाली होती. अचानक आमच्या ग्रुप मधील एकाने रंगपंचमी खेळायचे ठरवले.
झाले सगळे एकमेकांवर रंग घेऊन तुटून पडले. तास भर खेळून झाल्यावर लक्षात आले कि उन्ह चढायला लागलीत . त्यात भरीस भर म्हणून आणलेल्या कॅमेरा मध्ये उलटा रोल भरला होता, तो सरळ शेवट पर्यंत काही झाला नाही पण अजून थोडा वेळ त्यात गेला.

सौ. ईंटरनेट वरून साभार


मला ठाऊक होत कि मला उन्हाचा त्रास होतो. आणि माझी energy पण फार नव्हती. साधारण ९ वाजता पुन्हा ट्रेक सुरु झाला.
आमच्यात शीतल आणि कुणाला तरी वाट माहित होती कारण त्यांनी ह्या आधी हा ट्रेक केलेला होता. बघता बघता १ डोंगर पार झाला. शीतल म्हणाली फार नाही आता. समोरचा डोंगर पार झाला कि पोहचलोच आपण. २ तासाने मला थकवा जाणवू लागला. तरी सुद्धा मी स्वतःला रेटत होतो. हात फार मोडून आले होते त्या विचित्र बॅग मुळे. हळू हळू लोकांना कळू लागले कि मी मागे पडतोय. मग मी ठरवले कि आता थोडा आराम करायचा आणि मग चालायचे.

पायवाट

वाटेत मित्रांनी माझ्या बॅग मध्ये सामान आपापसात वाटून घेतले. मला फार वाईट वाटत होते कि किती मी मूर्खपणा केला होता. माणसाने आपली शक्ती जोखून च असली काम करावीत. उगीच फालतू आत्मविश्वास बाळगू नये.

तब्बल ५-६ तासाने आम्ही गडावर पोहोचलो. वाटेत शीतल चे डायलॉग येतच होते “अजून थोडं च शिल्लक आहे. ” मधेच एकदा कुणी तरी बोलले आरे आपण वाट चुकलोय बहुतेक. झालं माझ्या पायाखालची वाळूच सरकली.

ही सुद्धा एक पायवाट. साधारण एक माणुस चालेल ईतपत च

पण कुणास ठाऊक कुठल्या अजब शक्ती ने मी तो गड सर केला. मनात असंख्य प्रश्न येत होते कि जे गडावर कायमचे राहतात ते कसे रोज येजा करत असतील. कुणी आजारी पडले तर? इतक्या बिकट वाटेवर जीथे जेमतेम एक माणूस उभा राहू शकतो तिथून आजारी माणसाला कसे न्यायचे. कदाचित ह्याच लोकांची प्रेरणा मला वर जाण्यास मदत करत असावी. वाटेत नुकत्याच होउन गेलेल्या महशिवरात्री निमित्त उधळलेल्या गुलाल फुलांचा सडा पडलेला होता. असे समजले की लहान मुलांनी पण हा गड सर केला होता. काहींनी तर रात्रीच चढाई केली होती म्हणे. असं ऐकल की हुरूप याच्या मग परत जोमाने चालायला लागायचो.

गडावरील सुंदर वातावरण पाहून मन प्रसन्न झाले. तिथल्या थंडगार पाण्याने जीव शांत झाला. पुरातन शिव मंदिर पाहून फार छान वाटले.
संध्याकाळी बहुतेक काही लोक सह्याद्री चा कडा पाहायला निघून गेले. मला दुसऱ्या दिवशी गड उतरायची चिंता होती त्यामुळे गडावरील एका गुहेत च थांबायचे ठरवले.

पुरातन शिव मंदिर

रात्री मस्त पैकी तिथे च चुलीवर जेवण बनवले होते. रात्रीच्या अंधारात कधी झोप लागली कळलेच नाही.

——-भाग दुसरा——–

सकाळी मस्त पैकी छान वातावरण होते. सगळे जण फ्रेश झाले आणि मग गड उतरायचे कसे ह्या वर चर्चा सुरु झाली. कुणी म्हटले आलो तसेच जाऊ तर कुणी म्हणाले एक वेगळी वाट आहे का पाहू. मला वाटत ८०% लोकांना सोप्या वाटेने जावं असं वाटत होत. गडावरच्या एका माणसाने सल्ला दिला कि इथुन खाली धरणाचे काम चालू आहे. तिथून तुम्हाला गाडी वगैरे मिळू शकेल एखादी. वाह म्हणजे काम च झाले. फक्त अर्धा रस्ता पार करायचा कि मग झालाच काम.
निघालो सगळे लगेच त्या मार्गाने. पण म्हणतात ना आयुष्यात शॉर्टकट कधी कधी फार महाग पडतात. लांबचा असला तरी माहित असलेला रास्ता नेहमी बरा म्हणजे निदान आपल्या इप्सित ठिकाणी तरी पोहचू ह्याची खात्री असते.

कोकणकडा (सौजन्य ईंटरनेट वरुन साभार)

अतिशय साध्या रस्त्याने आम्ही पायपीट करत होतो. दुपारी एक गावकऱ्याकडेच जेवण उरकले. गावाच्या चुलीवरच्या जेवणाची बात च काही न्यारी होती.
साधारण २-३ वाजता आम्ही धरणा वर पोहोचलो. थोडीशी घासाघीस केल्यानंतर एका डंपर वाल्याने आम्हाला खाली सोडण्याचे कबूल केले. पण एका अटीवर कि त्याचे थोडे काम आहे ते झाले कि मगच जायचे. थोडा थोडा वेळ करता करता चांगली संध्याकाळ झाली मग आमची तगमग वाढायला लागली. गाडीवाल्याला विचारले कि तो एवढाच बोलायचा कि अजून थोडा वेळ थांबा. शेवटी भांडून आम्ही ती गाडी सोडायला लावली त्याला.

मनात तर विचार येत होता कि ज्या गडावर यायला इतका वेळ लागला तो इतक्या लवकर कसा संपेल? समुद्र सपाटी पासून बराच वर आहे गड. आणि जी शंका मनात आली होती ती खरी ठरली. त्या माणसाने आम्हाला दुसऱ्या एका साईट वर नेऊन आम्हाला उतरवले. आणि म्हणाला कि आता इथून पुढं पायी पायी जायचं .

विचारले तर म्हणाला लागतील एक ३-४ तास. आम्ही परत बॅकफूट वर फेकले गेलो होतो. करायला गेलो एक आणि झाले भलतेच. एक तर रात्र झाली होती सोबत मुली पण होत्या आणि रस्ता अनोळखी. काय करावे सुचत नव्हते. तोच एक आशेचा किरण दिसला. एक जीप वाला आम्हाला घेऊन जायला तयार झाला.

रस्त्यात ड्राइवर ने भुताखेतांच्या गोष्टी चालू केल्या. म्हणाला चला एके ठिकाणी मी तुम्हाला भूत दाखवतो. आयला आधीच इथे आमची तंतरली होती. म्हटलं चल गुमान रस्त्याने सरळ. आणि वाटेत एवढ्या रात्री दूरवर रस्त्याच्या कडेला एक आकृती दिसली बसलेली. म्हटलं खरंच भूत असावे एखादे.
पण मग कळले आमच्या सारखेच कुणी तरी ह्या वाटेने परत जात होते आणि त्या ग्रुप मधील एक जण पाय दुखत असल्या मुळे बसून होता.

त्याचा मित्र पायी पुढे निघाला होता काही गाडी वगैरे मिळते का बघायला. त्याला पण गाडीत घेऊन आम्ही त्याच्या मित्राला रस्त्यात गाठले. दोघांना गाडीत घेऊन प्रवास सुरु झाला.

रात्री आम्ही एका बस स्थानकावर पोहोचलो. आणि आम्हाला धक्काच बसला. आम्ही चक्क नाशिक च्या एका गावाला पोहोचलो होतो. म्हणजे गडाच्या एका बाजूने प्रवास करून दुसऱ्या भागाकडून खाली उतरलो होतो. शॉर्टकट फार महागात पडला होता. सकाळी मग नाशिक करत आम्ही मुंबई गाठली.

अश्या तऱ्हेने हा ट्रेक संपन्न झाला. आणि एक कायमची आठवण देऊन गेला.

त्या काळातला मी

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

I’m Mohi

Welcome to Mohitez, my cozy corner of the internet dedicated to my travelogue. Here, I invite you to join me on a journey of creativity, craftsmanship, and all little things which comes through my mindset.

Let’s connect